Monday, April 21 2025 9:52 am
latest

अमेरिकन डॉलरचे आमिष दाखवून दोन लाखांची फसवणूक

नवी मुंबई, 19 अमेरिकन चलन असलेले डॉलर स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून दोन लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार नुकताच नवी मुंबईतील घणसोली येथे घडला.

गुलफाम आलम अफसर अली असे तक्रारदाराचे नाव असून, ते कांदिवली येथे राहणारे आहेत. त्यांच्या परिचित एका नारळ विक्रेत्याने त्यांना २० डॉलरची नोट दाखवली होती. काही दिवसांपूर्वी एक फोन आला व फोनवरील व्यक्तीने तो नारळ विक्रेत्याचा भाऊ असल्याचे सांगितले. भावाने जशी नोट दाखवली तशा त्याच्याकडे १ हजार ७५० प्रति २० डॉलरच्या नोटा असल्याची माहिती दिली. तसेच गरज असल्याने या नोटांच्या बदल्यात भारतीय रुपये पाहिजे असल्याचे त्याने सांगितले. दोन लाख भारतीय रुपयांच्या बदल्यात हे डॉलर देण्यास त्याची एक नातेवाईक तयार असल्याचे त्याने सांगितले.

स्वस्तात एवढी मोठी रक्कम मिळते म्हणून गुलफाम याने पत्नीचे दागिने गहाण ठेवत दोन लाख रुपये जमा केले व घणसोली येथे ठरल्याप्रमाणे गेले. त्याठिकाणी फोनवर बोलणारी व्यक्ती आणि त्याच्यासोबत अन्य एक तरुण आला होता. गुलफाम यांनी दोन लाख रुपये दाखवत असतानाच त्याने हे पैसे पटकन हातात घेतले व डॉलरचे पुडके त्यांच्या पिशवीत टाकले. त्यानंतर आरोपी तेथून गेल्यावर जेव्हा पिशवीतील डॉलरचे पुडके गुलफाम यांनी पाहिले तेव्हा केवळ वर एक डॉलरची नोट, तर त्याखाली नोटेच्या आकाराचे कागदी पुडके होते.