Wednesday, February 20 2019 4:18 am

अभिनेते रमेश भाटकर यांचे मुंबईत निधन

मुंबई-: अभिनेते रमेश भाटकर यांचे मुंबईत निधन झाले. एलिझाबेथ हॉस्पिटल(नेपेन्सी रोड) मुंबई येथे अखेरचा श्वास घेतला. कर्करोगानं आजारी असल्यानं त्यांच्यावर एलिझाबेथ रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. ते 70 वर्षांचे होते. 1977 मध्ये त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. तीस वर्षांहून अधिक काळ ते अभिनय क्षेत्रात कार्यरत होते. वयाची 69 वर्षे पूर्ण केल्यानंतरही त्यांचा कामाचा उत्साह पूर्वीसारखाच कायम असायचा. वयाची पासष्टी ओलांडल्यानंतरही त्यांच्या चेह-यावर म्हातारपणाच्या म्हणाव्या तितक्या खुणा दिसत नव्हत्या. रमेश भाटकर यांच्या पत्नी मृदूला भाटकर या हायकोर्टाच्या न्यायाधीश असून त्यांना एक मुलगा आहे.

त्यांनी रंगभूमीवरूनच त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ‘अश्रूंची झाली फूले’ हे त्यांचे नाटक तर चांगलेच गाजले होते. तसेच त्यांची केव्हा तरी पहाटे, अखेर तू येशीलच, राहू केतू, मुक्ता यांसारखी अनेक नाटकं गाजली आहेत. १९७७ ला चांदोबा चांदोबा भागलास का या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अष्टविनायक, दुनिया करी सलाम, आपली माणसं यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी ९० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. काही दिवसांपूर्वीच ते ‘तू तिथे मी’ आणि ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेत दिसले होते.