Friday, April 19 2019 11:56 pm

अभिजित-शिवराज सलामीला आमनेसामने

पुणे : महाराष्ट्र केसरी गटाच्या लढतींना आज, शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. यावेळी महाराष्ट्र केसरीचा मान कोण मिळवणार, याबाबत उत्सुकता आहे. या स्पर्धेत गादी विभागात एकूण ३९ मल्ल असून, माती विभागात ३५ मल्ल आहेत. गादी आणि माती विभागातील विजेता मल्ल महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढतील.

गादी विभागात पुणे शहरचा गतवर्षीचा उपमहाराष्ट्र केसरी अभिजित कटके व पुणे जिल्ह्याचा शिवराज राक्षे पहिल्याच फेरीत आमनेसामने येणार आहेत. याबरोबर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (सांगली), सागर बिराजदार (लातूर), अक्षय शिंदे (बीड), विष्णू खोसे (नगर), कौतुक डाफले (कोल्हापूर) आदी मल्ल किताबासाठी लढणार आहेत. चंद्रहार पाटीलची सलामीची लढत गणेश जगतापशी होईल. दुसऱ्या फेरीत चंद्रहार आणि अभिजित कटके आमनेसामने येण्याची दाट शक्यता आहे. पुण्याच्या सचिन येलभरची बीडच्या अक्षय शिंदेसह लढत होईल, तर मुंबईचा विक्रांत जाधव लातूरच्या सागरविरुद्ध लढणार आहे.

माती गटातून महाराष्ट्र केसरीसाठी पुणे शहरचा साईनाथ रानवडे, माऊली जमदाडे (सोलापूर), उपमहाराष्ट्र केसरी विलास डोईफोडे (जालना), तानाजी झुंजरके (पुणे), बाळा रफिक (बुलढाणा), किरण भगत (सातारा), ज्ञानेश्वर गोचडे (लातूर) आदी मल्ल किताबासाठी लढतील. दरम्यान, या वेळी महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढणाऱ्या मल्लांची भूगावमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीतूनच महाराष्ट्र केसरीची गदा आखाड्यात आणण्यात आली.

गुरुवारी ‘ब’ गटाच्या म्हणजे ६१, ७० आणि ८६ किलो गटाच्या लढती रंगल्या. यात माती विभागातील ७० किलो गटात लातूरच्या अलिम शेखने अहमदनगरच्या विकास तोरडमलला नमविले. अलिम शेखची उपांत्य फेरीत अरुणशी लढत होईल. अरुणने दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत धुळ्याच्या ज्ञानेश्वर पवारवर विजय मिळवला. यानंतर दुसरी उपांत्य लढत औरंगाबाद शहरच्या अजहर पटेल आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या राम कांबळे यांच्यात रंगणार आहे. अजहरने नाशिक शहरच्या श्रीराम चहाळेवर मात केली, तर रामने मुंबई शहरच्या चैतन्य पाटीलवर विजय मिळवला.