Friday, February 14 2025 7:35 pm

‘अभिजात भाषेला आधुनिक भाषा करण्याचे मोठे आव्हान मराठी भाषकांसमोर आहे’ -डॉ. निर्मोही फडके यांचे प्रतिपादन

ठाणे महानगरपालिकेत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन

ठाणे 16: एक मराठी भाषक म्हणून आपण आपल्या मराठी भाषेचा अभिमान बाळगून ही भाषा जास्तीत जास्त टिकण्यासाठी लक्ष्य निर्धारित करून वाटचाल करायला हवी. आपल्या कणाकणात मराठीचा अभिमान जाणवायला हवा. अभिजात भाषेला आता आधुनिक भाषा करण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे, असे प्रतिपादन डॉ. निर्मोही फडके यांनी ‘जगू मराठीचे रंगी’ या विषयावरील व्याख्यानात केले. ठाणे महापालिका मुख्यालय येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या उद्घाटन डॉ. फडके यांच्या व्याख्यानाने झाले.

राज्यभरात १४ जानेवारी ते २८ जानेवारी, २०२५ हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने ठाणे महानगरपालिकेतही विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवड्याचे उद्घाटन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, उपायुक्त (माहिती व जनंसपर्क) उमेश बिरारी आणि डॉ. निर्मोही फडके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मंगळवारी सकाळी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे करण्यात आले. त्यानंतर, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी डॉ. निर्मोही फडके यांचे ‘जगू मराठीचे रंगी’ या विषयावर व्याख्यान झाले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नुकताच मिळाला आहे. त्यामुळे हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अधिक उत्साहाने साजरा करण्याचा योग आला आहे. आपली भाषा ही रांगडी भाषा आहे. संतानी आपल्या नसानसात रुजवलेली भाषा आहे. त्यामुळे काहींच्या मनात भाषेच्या भवितव्याविषयी व्यर्थ चिंता आहे. आपली भाषा शतकानुशतके टिकणारी आहे. त्या भाषेचा प्रवाह वाहता ठेवून तीला आणखी समृद्ध करण्याची जबाबदारी आपली आहे, असे प्रतिपादन या पंधरवड्याचे उद्घाटन करताना ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी केले.

डॉ. निर्मोही फडके यांनी व्याख्यानाच्या पूर्वाधात मराठीच्या आजवरच्या वाटचालीचा धांडोळा घेतला. अभिजात भाषेचा अर्थ त्यांनी श्रोत्यांशी संवाद साधत उलगडून दाखवला. त्याच जोडीने मराठीच्या व्याकरणाचे सोपे नियम समजावून सांगितले. शासकीय कामकाजातील सतत वापरल्या जाणाऱ्या शब्दांची उदाहरणे देत त्यांनी मराठी, संस्कृत शब्दांच्या गंमती जमतीही सांगितल्या. तर, उत्तरार्धात आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग असलेल्या मराठी भाषेला पुढील पिढीकडे समर्थपणे सोपवण्याची जबाबदारी आपली आहे. त्यासाठी आपण आज या संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने संकल्प करूया, असे आवाहन डॉ. फडके यांनी केले.

कार्यक्रमाची सांगता करताना उपायुुक्त उमेश बिरारी यांनी भाषेच्या वापराबदद्लची सजगता आणि आग्रह यांचे विवेचन केले. तसेच, पंधरवड्याच्या काळात होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषाही स्पष्ट केली. प्राजक्ता जोशी यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. राजेंद्र पाटणकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.