Thursday, December 5 2024 7:21 am

अपक्ष उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी लाखोंची गर्दी…

वृद्ध महिला – पुरुष , तरूण वर्ग मोठया प्रमाणात सामील
निलेश सांबरेंचा विजय निश्चित…जाणकारांचे मत

*निलेश सांबरेंनी निवडणूक अर्ज केला दाखल; *
सहा लाख मते मिळून निवडून येणार- निलेश सांबरे
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद

भिवंडी, 30 : २३-भिवंडी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणारे जिजाऊ संघटना महाराष्ट्र अध्यक्ष आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी आज भिवंडी येथे त्यांचा निवडणूक नामनिर्देशन अर्ज दाखल केला. अर्ज भरण्याअगोदर निलेश सांबरे यांनी विशाल शक्तिप्रदर्शन केले. सांबरे यांना शुभेच्च्छा देण्यासाठी जिजाऊ संघटनेचे असंख्य कार्यकर्ते तसेच त्यांना पाठींबा दिलेल्या पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक कोंबडपाडा येथून प्रांत कार्यालयापर्यंत निलेश सांबरे यांच्या समर्थनार्थ एक रॅली काढण्यात आली. अपक्ष म्हणून अर्ज दाखल करताना इतकी गर्दी संपूर्ण महाराष्ट्रात कुठेच पाहायला मिळाली नाही , ज्यात वृद्ध महिला – पुरुष , तरूण वर्ग मोठया प्रमाणात या ठिकाणी सामील झाल्यामुळे निलेश सांबरें यांना जनमानसातून वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे यादरम्यान पाह्यला मिळाले .

निलेश सांबरे हे निवडणूक अर्ज भरत असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. रॅलीमध्ये जमलेल्या समर्थकांनी “चला शेतकऱ्याच्या मुलाला संसदेत पाठवण्यासाठी सज्ज होऊया; परिवर्तनाचा आरंभ करूया!” , “माझं मत विकासाला, जिजाऊच्या निलेश सांबरेंना!” , परिवर्तनाचे खरे दावेदार; निलेश सांबरे साहेबंच आमचे भावी खासदार!”, “सत्तापिपासुंना घरचा रस्ता दाखवणार; निलेश सांबरेंना लोकसभेत पाठवणार!” अशा आशयाच्या अनेक घोषणा यावेळी दिल्या.
आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना निलेश सांबरे म्हणाले की, बदलापूर, वाडा, शहापूर येथील रुग्णालयांची दुरावस्था आहे. येथे एज्युकेशन हब नाही. लोकसभा क्षेत्रात मेडिकल कॉलेज नाही, आयटी पार्क नाही. वस्त्रोद्योग व्यवसायाबाबत कोणताही सकारात्मक निर्णय होत नाही. सुरतला जसा टेक्स्टाईल पार्क आहे तसा भिवंडीतही झाला पाहिजे. येथेही माणसे राहतात मात्र त्याकडे कोणताही नेता-लोकप्रतिनिधी गांभीर्याने बघत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी मी अपक्ष, तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून फॉर्म भरला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .

आपला निवडणूक अर्ज भरण्याच्या प्रसंगी एवढा विशाल जनसमुदाय एकत्रित झाल्याने निलेश सांबरे काही अंशी भावनिक झाल्याचे दिसून आले. जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना त्यांनी संबोधित केले त्याचप्रमाणे “राजकारण हा माझा प्रांत नव्हता पण जे राजकारणात आहेत त्यांनी आतापर्यंत जनतेच्या भल्यासाठी जे करायला हवे होते ते केले नाही. म्हणूनच आपल्याला राजकारणात यावे लागले म्हणूनच आता आपल्या सर्वांचे भले करायचे असेल , मुलांना चांगले शिक्षण , नागरिकांना चांगले आरोग्य , हाताला रोजगार हे जर हवे असेल तर मला निवडून द्यावे” असे भावनिक आवाहनही त्यांनी यावेळी केले. आपल्या भाषणात त्यांनी “जनतेला मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे हे लोकप्रतिनिधींचे काम आहे. पण आजपर्यंत असं काम इथल्या लोकप्रतिनिधींनी प्रामाणिकपणे केलं आहे का?” असा प्रश्नही प्रस्थापित राजकारण्यांवर उपस्थित केला.
तर जमलेल्या गर्दीबाबत विचारले असताना हे शक्तिप्रदर्शन नाही तर कार्यकर्त्यांचे प्रेम आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी माझ्यासोबत जिजाऊ संघटनेचे, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी-कार्यकर्ते आहेत. आई-बहीण सोबत आले आहेत. आमच्याकडे कोणी नेता नाही. आम्ही सामान्य माणसे आहोत. नेते येतात व भाषण ठोकतात आणि निघून जातात. आम्ही भिवंडीचा गल्लीबोळ बघितला आहे. गावनगाव बघितला आहे. इथल्या समस्या बघितल्या आहेत. या समस्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी लाखाच्या घरात जनसमुदाय आज इथे जमला आहे. एक लाख गुणिले पाच केले तरी सहा लाख मते आम्हाला मिळतील असा दावा यावेळी सांबरे यांनी केला.
जनतेचा वाढता प्रतिसाद आणि विविध संघटनांचा तसेच वंचित बहुजन आघाडीसारख्या राष्ट्रीय पातळीच्या पक्षाचा जाहीर पाठींबा यांसह कुणबी एकीकरण समिती, खानदेश सेना बळीराज पार्टी, किसान काँग्रेस यांसारख्या अनेक संघटनांचा वाढता पाठींबा मिळत असल्याने सध्या निलेश सांबरे यांची भिवंडी लोकसभा मतदार संघात जोरदार चर्चा आहे. या साऱ्या गोष्टींमुळे सध्याच्या निवडणुकीत सांबरे यांचं पारडं जड वाटत आहे. त्याचप्रमाणे २३-भिवंडी लोकसभा मतदार संघात २० मे रोजी होऊ घातलेली तिरंगी लढत चुरशीची होईल असे चित्र सध्या तयार झाले आहे.
याप्रसंगी निलेश सांबरे यांना पाठिंबा देण्यासाठी शरद पाटील ठाणे जिल्हाध्यक्ष कुणबी सेना , श्याम दुपारे उपजिल्हाप्रमुख ठाणे कुणबी सेना, भगवान सांबरे तालुकाप्रमुख भिवंडी ग्रामीण कुणबी सेना , गुरुनाथ शेलार उपजिल्हाप्रमुख ठाणे कुणबी सेना, केशव पाटील जिल्हा संघटक ठाणे कुणबी सेना, पराग पष्टे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष किसान काँग्रेस, सुहास बोंडे अध्यक्ष खानदेश सेना , वंचित बहुजन आघाडीचे प्रभारी मिलिंद कांबळे , वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हा अध्यक्षा माया कांबळे, मौलाना आजाद विचार मंचाचे ठाणे जिल्हा व भिवंडी शहर अध्यक्ष जव्वाद चिखलेकर, शाहझहान अन्सारी (महिला भिवंडी शहर जिल्हाप्रमुख ) यांसह लाखो कार्यकर्ते सांबरे समर्थक आणि चाहते यावेळी उपस्थित होते.