अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – आ. केळकर
ठाणे, 12- राज्य शासनाने ठाण्यातील रस्त्यांसाठी ६५० कोटी दिले, पण अधिकारी आणि ठेकेदारांच्या आर्थिक लागेबांधे असल्याने रस्ते खड्ड्यात गेले. त्याचा नाहक फटका करदात्या ठाणेकरांना बसत आहे. आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत आणि ठेकेदारांना का यादीत टाकावे, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली.
ठाण्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून अपघात, वाहतूक कोंडी अशा समस्यांनी सर्वसामान्य ठाणेकर गांजला आहे. या समस्यांना अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला.
राज्य शासनाने ठाण्यातील रस्त्यांसाठी ६५० कोटी रुपये दिले. मात्र अनेक रस्ते कमी पावसातच खड्ड्यात गेले. दर्जाहीन कामे झाल्याने हा निधी वाया जात आहे. भर पावसात खडी सिमेंट टाकून खड्डे बुजवण्याचा लाजिरवाणा प्रकार ठाण्यात पाहायला मिळाला. आयुक्तांनी १२ तासांत खड्डे बुजवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले, मात्र अधिकारी आणि ठेकेदारांचे आर्थिक हितसंबंध असल्याने हे आदेश हवेत विरले. आयुक्तांचा आणि अधिकाऱ्यांचा ताळमेळ नसावा तर दुसरीकडे अधिकारी आणि ठेकेदारांची हातमिळवणी आहे, त्यामुळेच प्रामाणिकपणे कर भरूनही ठाणेकरांना खड्ड्यांशी सामना करावा लागत आहे. अशा अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करावे आणि संबंधित कंत्राटदारांना पुन्हा काम देण्यात येऊ नये, अशी मागणी श्री.केळकर यांनी आयुक्तांकडे केली आहे.
*नागरिकांना त्रासदायक वाहतूक बदल पूर्ववत करणार*
सध्या नागरिकांना विश्वासात न घेता वाहतुकीत बदल होत आहेत. काही ठिकाणी दुभाजकांनी वळण रस्ते बंद केले जात आहेत तर कुठे मार्गच बदलले जात आहेत. यामुळे वाहन चालक आणि नागरिकांची ससेहोलपट होत आहे. याबाबत आमदार संजय केळकर यांना विचारले असता ते म्हणाले, वाहतूक बदल हे नागरिकांना त्रासदायक नव्हे तर फायदेशीर असावेत, याबाबत मी या पूर्वीच वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना सुचित केले आहे. सध्या सुरू असलेले बदल निश्चितच नागरिकांना त्रासदायक असून विरोध होत आहे. त्यामुळे झालेले आणि होत असलेले बदल पूर्ववत करून नागरिकांना दिलासा देणार असल्याचे श्री. केळकर म्हणाले.