Thursday, August 22 2019 5:02 am

अतिक्रमण विभागाने पाठलाग केल्याने फेरीवाल्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

ठाणे :वर्षानुवर्षे रस्त्याच्या कडेला चप्पल विकण्याचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेता फरीद अहमद रा. वडवली गाव पुनर्वसन चाळ , ठाणे याचा मालजप्त करण्यासाठी पालिका अतिक्रमण विभागाच्या पथकाने बुधवारी पाठलाग केला. माल आणि हातगाडी जप्त करतील या भीतीने  गाडी घेऊन पाळणाऱ्या विक्रेत्याचा हृदयविकाराचा झटका आल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अतिक्रमण विभागाच्या पथकाच्या या जुजबी कारवाई विरोधात स्थानिक नागरिक आणि विक्रेत्यांमध्ये संताप आहे. फरीदचा मृतदेह पालिकेच्या स्वाधीन करू असा पवित्रा स्थानिकांनी घेतला.
 बुधवारी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कासारवडवली परिसरातील विजयपार्क परिसरात रस्त्याच्या बाजूला हातगाड्यांवर फेरीवाला  व्यवसाय करणाऱ्यावर सातत्याने कारवाई करीत हजारो रुपयांचा माल  जप्त करून हजारो रुपयांच्या हातगाड्या तोडण्याचा नवा फंडा पालिका अतिक्रमण विभागाने अंगिकारल्याने बुधवारी अप्रिय घटना विजयपार्क परिसरात घडली. रोज पालिका अतिक्रमण विभाग या फेरीवाल्यांकडून ३० ते ४० रुपयांची पावती फाडून घेत तसेच कधीही तोडू कारवाईसाठी पालिका पथक जेसीबी घेऊन यायचे आणि फेरीवाल्यांच्या गाड्या तोडून माळ जप्त करून हजारो रुपयांचे नुकसान करीत होते. पालिका अतिक्रमण विभागाच्या कारवाईने रास्ता कच्चा असताना पासून फेरीवाल्याचा व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर विध्वंसक कारवाईमुळे  सर्वसामान्य फेरीवाले यांचे जिणे हराम झाले आहे. बुधवारी पालिका अतिक्रमण विभाग अशाच विध्वंसक कारवाईसाठी आले. रस्त्याच्याकडेला बसलेल्या फेरीवाल्यांच्या गाड्या पकडल्या आणि त्याच ठिकाणी जवळच असलेल्या फरीद अहमद याचीही गाडी पकडली. फरीदने कशीबशी गाडी सोडवून माल  व गाडी घेऊन पळू लागला. आताच कर्ज काढून माल  भरला तोही जमा होईल आणि गाडीही तुटेल या भीतीने आकांत करीत पळत असताना त्याच्या पाठीमागे अतिक्रमण विभागाचे पथकही पळत होते. काही अंतरावर गेलेल्या फरीद याची दमछाक झालाय आणि धास्तीने त्याला हृदयविकाराचा झटका आला. अन फरीद अहमद खाली पडला. आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हजारो रुपयांचा माळ आणि गाडी वाचविण्यासाठी फरीदचा लाखमोलाचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली आणि विजयपार्क परिसरात फेरीवाले, बघे आणि नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते. तर तणावही निर्माण झाला होता. फरीद या फेरीवाल्याचा असा दुर्दैवी मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. 
 
              कर्ज काढून घेतली होती गाडी आणि भरला होता माल 
 
              केंद्र शासनाच्या राष्ट्रीय फेरीवाला धोरणाच्या तीनतेरा वाजल्या आहेत. फेरीवाला धोरण कागदावर तयार आणि प्रत्यक्षात काहीच नाही. कासारवडवली विजयपार्क परिसरात मोठ्या रस्त्याच्या कडेला २० वर्षांपासून चप्पल विक्रीचा धंदा करणाऱ्या फरीद अहमद याचा काही दिवसापूर्वी कारवाईत गाडी आणि माल जप्त झालेला होता. त्यामुळे फरीदने २० हजाराचे कर्ज घेऊन बुधवारी माल भरला होता. बुधवारी सकाळीच गाडीवर माळ लावला आणि पालिका अतिक्रमण विभाग जेसीबी घेऊन कारवाईसाठी आले. पथकांच्या कर्मचारी यांनी काही फेरीवाल्यांच्या गाड्या आणि माल ताब्यात घेतला त्याचवेळी फरीद अहमदचा मालहि ताब्यात घेतला. पण कसाबसा गाडी सोडवून फरीद घेऊन पळू लागला. माल आणि गाडी जप्त झाल्यास खायचे काय? या भीतीपोटी फरीद पळत असताना पथकातील कर्मचारी यांनी त्याचा पाठलाग केला. काही दूरवर गेल्यानंतर फरीदला हृदयविकाराचा झटका आला. अन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. 
 
                      पाच मुली-३ भाऊ कुटुंबाने करायचे काय? 
                          आईचा आणि नागरिकाचा सवाल  
 
               पालिका अतिक्रमण विभागाच्या पथकाच्या कारवाईत माल वाचविण्याच्या भानगडीत हृदयविकाराचा झटका आला आणि मृत्यू ओढवला. मृतक फरीद हा कुटुंबातील कामविणारा व्यक्ती होता. पाच मुली आणि तीन मुले आणि पती-पत्नी अशा दहा जणांचा उदरनिर्वाहाचा गाडा फरीद फेरीवाल्याचा धंदा करून मागील २० वर्षांपासून करीत होता. रस्तारुंदीकरण झाल्यानंतर पालिकेची टोळधाड कधीही कारवाईसाठी येत असल्याने पूर्वीच टेन्शनमध्ये फेरीवाले होते. त्यातच अगोदरच्या कारवाईत माल जप्त झाल्याने कर्ज घेऊन माल भरला आणि तो  वाचविण्यासाठी फरीदने प्राण गमावले. मागे असलेल्या परिवारात लहान मुले-मुली आहेत. कामविणारा गेला आता कुटुंबाने करायचे काय? असा यक्ष प्रश्न या कुटुंबासमोर आणि नागरिकांसमोर उभा राहिला आहे. पालिका अतिक्रमण विभागाच्या कारवाईने फरीदचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याचा मृतदेह आम्ही पालिकेच्या स्वाधीन करू आणि त्याच्या कुटुंबाला पालिकेत बसवू असा सूर स्थानी नागरिकांनी आणि फेरीवाल्यांची काढला. 
 
           पालिकेच्या वारंवारच्या कारवाईने…. फेरीवाले कर्जदार झाले
 
              रस्तारुंदीकरण केल्यानंतर या परिसरातील फेरीवाल्यांचे जिणे हराम झाले. रोज पावत्या ३० ते ४० रुपयांच्या पालिका पथक घेते आणि कधीही मन मानेल तेव्हा कारवाई करण्यासाठी येतात असा ससेमिरा या फेरीवाल्याच्या मागे लागला होता. त्यामुळे कारवाईत पालिका पथक गाडी जेसीबीने तोडतात आणि हजारो रुपयांचा माल जप्त करतात. त्यामुळे फेरीवाल्यांचे पुन्हा कर्ज काढून माल आणि गाडी तयार करावी लागते. पालिकेच्या सातत्याच्या कारवाईने आज फेरीवाले हे कर्जदार झाले असल्याची व्यथा त्याच परिसरात २० वर्षांपासून फेरीवाल्याचा धंदा करणाऱ्या फेरीवाल्यांची व्यक्त केल्या. पालिका प्रशासनाने केंद्राच्या राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी पारदर्शकतेने केल्यास कमीतकमी २० वर्षांपासून जीवनाचा गाडा याच धंद्यावर चालविणाऱ्या कुटुंबाला उदरनिर्वाहाचा हक्काचा परवाना तरी मिळेल असा सूरही समाजसेवक आणि फेरीवाल्यांची काढला.