Thursday, January 28 2021 7:16 am

अजित पवार हेच होणारे उपमुख्यमंत्री : शिवसेना नेते संजय राऊत

नागपूर : नागपूरमध्ये गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह प्रमुख नेतेही उपस्थित होते. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार तसेच शेतकरी कर्जमाफीबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर ‘आता सांगण्यासारखं काही नाही, जेव्हा काही ठरेल तेव्हा तुमच्या माध्यमातूनच सर्वांना सांगू’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी माध्यमांकडे दिली होती. त्याचवेळी अजित पवार यांनी २३ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे संकेत दिले होते. मुख्यमंत्र्यांनी संमती दिली तर २३ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकेल, असे अजितदादांनी माध्यमांना सांगितले होते.

एकीकडे मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध महाविकास आघाडीतील सर्वच इच्छूकांना लागलेले असताना दुसरीकडे अजित पवार यांच्यासाठी उपमुख्यमंत्रिपदाचे दरवाजे पुन्हा एकदा उघडू लागल्याचेच स्पष्ट संकेत सर्व घडामोडींतून मिळत आहेत. सिंचन घोटाळ्यातून क्लीन चिट मिळाल्याने अजितदादांसाठी तो मोठा दिलासा ठरला असून अजितदादा तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची धुरा वाहण्यासाठी सज्ज झालेत, असे बोलले जात आहे. संजय राऊत यांच्या सूचक विधानाने त्याला आणखीच बळकटी मिळाली आहे. राज्यात महाविकास आघाडी उभारण्यात आणि या आघाडीचे सरकार आणण्यात राऊत यांचाही मोठा वाटा राहिला आहे. शरद पवार या आघाडीचे शिल्पकार असतील तर आघाडीचे ‘स्क्रिप्ट रायटर’ राऊतच होते. त्यामुळे राऊतांनी अजित पवार यांच्याबद्दल केलेले विधान महत्त्वाचे ठरते.