Thursday, December 5 2024 5:59 am

अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात ठाण्यात भाजपाचे निषेध आंदोलन

ठाणे – २ : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांविरोधात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ ठाणे शहर भाजपाच्या वतीने आज निषेध आंदोलन करण्यात आले. भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा तीव्र निषेध केला. यापुढील काळातही ठाण्याच्या विविध भागात आंदोलने करण्याचा इशारा भाजपाच्या वतीने देण्यात आला आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत, असे वक्तव्य केले होते. त्याचा समाजाच्या सर्व स्तरांतून निषेध व संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने खोपट येथे निषेध आंदोलन घेण्यात आले. या आंदोलनात भाजपाच्या कार्यकर्त्यांबरोबरच मोठ्या संख्येने नागरिकही सहभागी झाले होते. त्यात अजित पवार यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
छत्रपती संभाजी महाराजांनी नरकयातना भोगूनही धर्मांतर केले नव्हते. त्यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी कार्य केले होते. त्यामुळे अजित पवार यांचे वक्तव्य निंदनीय आहे, असे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले. तर `दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण’ असा टोला लगावत आमदार संजय केळकर यांनी अजित पवारांचा तीव्र निषेध केला. या आंदोलनात भाजपाचे प्रदेश सचिव संदिप लेले, शहर सरचिटणीस विलास साठे, कैलास म्हात्रे, मनोहर सुगदरे, महिला मोर्चाच्या मृणाल पेंडसे,युवा मोर्चा अध्यक्ष सारंग मेढेकर यांच्यासह माजी नगरसेवक-नगरसेविका सहभागी झाल्या होत्या.