Thursday, December 5 2024 6:47 am

अजितदादांना भाषण नाकारणे ही दडपशाही

ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून मूक निदर्शने

ठाणे (प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहूच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रम पार पडला. पण, यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भाषणच करू न दिल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार, ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे आणि ठाणे-पालघर महिला विभागिय अध्यक्षा ॠताताई आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मूक निदर्शने करुन प्रधानमंत्री कार्यालयाचा निषेध केला.

देहूमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण सोहळा सोमवारी पार पडला. लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी मंचावर उपस्थितीत असलेल्या नेत्यांपैकी देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे या तिघांची भाषणे झाली. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही. विशेष म्हणजे, देहू संस्थानने अजितदादा यांच्या भाषणासंदर्भात प्रधानमंत्री कार्यालयास कळविले होते. मात्र, तरीही, जाणीवपूर्वक कार्यक्रम पत्रिकेतून प्रधानमंत्री कार्यालयाने अजितदादांचे नाव हटविले. हा प्रकार म्हणजे 13 कोटी मराठी जनतेचा अवमान असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मूक निदर्शने केली.

यावेळी, महिला अध्यक्षा सुजाता घाग म्हणाल्या की, सत्तेसाठी वेडे झालेले फडणवीस काय करीत आहेत, हे त्यांना समजत नाही. त्यातूनच त्यांनी महाराष्ट्र द्रोह केला आहे. तर युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांनी, तुकारामाची पगडी धारण केली. या देशाचा पंतप्रधान किती नाठाळ आहे, हे त्यांनी दाखवून दिले. संविधानिक पदाचा अपमान मोदी आणि प्रधानमंत्री कार्यालयाने केला आहे. त्याचा निषेध आम्ही संविधानकर्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर केला आहे, असे सांगितले.

कैलास हावळे यांनी, महाराष्ट्राचा अवमान झाला आहे. प्रत्येक मराठी माणसाचा अवमान झाला आहे. केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून सर्वांची मुस्कटदाबी सुरू आहे. सह्याद्री दिल्लीसाठी छातीचा कोट करीत आहे. तरीही मराठी मातीचा अवमान होत असेल तर आम्ही तो सहन करणार नाही. आम्ही या भाजपच्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा दिला.
या आंदोलनात महिला कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, विद्यार्थी सेलचे अध्यक्ष प्रफुल कांबळे, सामाजिक न्यायविभागाचे अध्यक्ष कैलास हावळे, युवती अध्यक्षा पल्लवी जगताप, सरचिटणीस प्रभाकर सावंत, रवींद्र पालव आदी उपस्थित होते.