Sunday, July 5 2020 8:17 am

अग्निशमन दलाच्या कारवाईचा विरोधात ठाण्यातील हॉटेल, बारचा संप

ठाणे, दि. ६ (प्रतिनिधी)अग्निशमन दलाकडून आवश्यक कागपत्रांची पूर्तता न केलेल्या हॉटेल व बारला सील ठोकण्याचा सिलसिला कायम असताना या कारवाईविरोधात शहरातील ५०० हुन अधिक हॉटेल व बारने आजपासून ‘शटर डाऊन’केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य ठाणेकरांच्या हॉटेलिंगला ब्रेक लागला असून बुधवारी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीनंतरच या संपाबाबत पुढील निर्णय जाहीर करणार असल्याचे हॉटेल असोशिएशनकडून स्पष्ट करण्यात आले.
ठाणे शहरातील ज्या ५०० चौरस फुटापेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या हाॅटेल्स, लाऊंज बारनी अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला सादर केलेला नाही. तसेच महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ च्या तरतुदींचे पालन केलेले नाही. त्यांना गेल्या दोन दिवसांपासून सील ठोकण्याची मोहीम अग्निशमन दलाने आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या आदेशाने सुरु केली आहे. मात्र अधिनियम कायद्यातील अटी – शर्ती व ‘अँडमिनिस्ट्रेशन पेनल्टी टॅक्स’प्रणालीला विरोध करून हॉटेल व बार व्यावसायिक चार वाजल्यापासून संपावर गेले. तर अग्निशमन दलाच्या अटींची पूर्तता करूनही हॉटेलवर कारवाई होत असल्याने ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, घोडबंदर रोड येथील हॉटेल व बारने हा संप पुकारल्याचे हॉटेल असोशिएशनच्या रत्नाकर शेट्टी यांनी स्पष्ट केले.
* आयुक्त भेटीत निर्णय
आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासोबत हॉटेल असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी दुपारी बैठक होणार आहे. यावेळी आयुक्तांना निवदेन देऊन व त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या आश्वासनांचा विचार करून हॉटेल संपाबाबत पुढील रूपरेषा स्पष्ट करण्यात येईल, असे रत्नाकर शेट्टी यांनी सांगितले. तर तिसऱ्या दिवशीही सात हॉटेल व बारवर कारवाई करण्यात आली असून हॉटेल असोशिएशनचा दावा चुकीचा असल्याचे पालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांनी सांगितले