Thursday, August 22 2019 4:33 am

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

पुणे -: मराठी साहित्य संमेलनातील निमंत्रण वादाच्या मुद्यावरून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा राजीनामा देणारे श्रीपाद जोशी यांनी आपल्या राजीनाम्यामागे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रेरणा असल्याचे म्हटले आहे. साहित्य संमेलनातील गोंधळाचा हा ’प्लॉट’ नेमका कुणी रचला याचा शोध घ्या, असे आवाहनही जोशी यांनी केले आहे.

यवतमाळ इथं होणाऱया 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना निमंत्रण देण्यात आले होते. काही संघटनांच्या विरोधनंतर हे निमंत्रण मागे घेण्यात आले. संमेलनाच्या आयोजकांनी या निर्णयासाठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांना जबाबदार धरले होते. तर, महामंडळाने आयोजकांकडे बोट दाखवलं होते. मात्र, जोशी हेच सगळय़ांच्या टीकेचे धनी ठरले होते. अखेर आज सकाळी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

सुरुवातीला राजीनाम्याबद्दल बोलण्यास नकार देणाऱया जोशी यांनी नंतर आपली नाराजी बोलून दाखवली. नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनाम्याची प्रेरणा मला राज ठाकरे यांच्याकडून मिळाल्याचे ते म्हणाले. ’हा वाद मनसेच्या एका छोट्या कार्यकर्त्यांना संमेलन उधळण्याची धमकी दिल्यामुळे सुरू झाला होता. त्या कार्यकर्त्यांचे कृत्य आपल्या अंगावर घेऊन राज यांनी माफी मागितली. मनाचा मोठेपणा दाखविला. मी देखील तसेच केले, असे सांगून, दुसऱयाच्या चुकीची जबाबदारी आपण घेत असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचवले. ’आयोजकांनी मला खलनायक आणि दहशतवादी ठरवले. हे सगळं अत्यंत वेदनादायी होते. हे सगळे का झाले याचा शोध घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.