नागपूर, 13 : नगरपरिषद अंबाजोगाई (जि. बीड) येथील कर्मचाऱ्यांचे वेतन अंबाजोगाई पिपल्स नागरी सहकारी बँकेतून अदा करण्याप्रकरणी जिल्हाधिकारी, बीड यांच्यामार्फत चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर काही अनियमितता झाली असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
याबाबत सदस्य श्रीमती नमिता मुंदडा यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री. सामंत म्हणाले की, नगरपरिषदेचे सहाय्यक अनुदानासाठी राष्ट्रीयकृत बँकेमधील खाते आहे. या खात्यात अनुदान मिळते. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून देण्याबाबत नियम आहे. हा नियम होण्यापूर्वी अंबाजोगाई पीपल्स नागरी सहकारी बँकेतील खात्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन मिळत होते. मात्र २० मे २०२१ रोजी पुन्हा वेतन खाती सहकारी बँकांमध्ये असल्यास वेतनाची अदायगी त्याच खात्यात करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. शासनाची खाती पुन्हा सहकारी बँक, पतसंस्था याकडे देण्याबाबत सदर वित्तीय संस्थेची पूर्ण आर्थिक परिस्थिती बघूनच निर्णय घेण्यात येतो.
या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य अशोक चव्हाण यांनी भाग घेतला.