ठाणे, ०४ : अंबरनाथ शहरातील शिलाहारकालीन प्राचीन शिवमंदिर परिसराचा विकास लवकरच केला जाणार आहे.या अनुषंगाने संपूर्ण अंबरनाथ शहर सुशोभित करण्याचा आणि शहराची ओळख राष्ट्रीय स्तरावर मंदिरांचे शहर अर्थात टेंपल सिटी (Temple City ) म्हणून करण्याची संकल्पना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मांडली होती. त्यानुसार शहरातील सर्व चौकांचे आणि मोठया रस्त्यांचे सुशोभिकरण करण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञ प्रकल्प व्यवस्थापन आणि सल्लागारांची नेमणूक करण्यासाठी आता अंबरनाथ नगरपालिकेने निविदा प्रसिध्द केली आहे. शहरातील शिलाहारकालीन वास्तू वैभवाला साजेसे असे चौक आणि रस्त्यांचे सुशोभिकरण करण्यात येत आहे.
गटार आणि पायवाटांव्यतिरिक्तही शहराचा विकास कसा साधता येतो हे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या काही वर्षात राबवलेल्या प्रकल्पांमधून दाखवून दिले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवून साकार झालेला विकासाचा अंबरनाथ पॅटर्न सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे. अंबरनाथ शहराच्या पूर्व भागात ९६३ वर्षापूर्वीचे शिलाहारकालीन प्राचीन शिवमंदिर आहे. या प्राचीन वास्तुच्या माध्यमातून अंबरनाथ शहराची ओळख प्रभावीपणे स्थापित करण्याच्या दृष्टीकोनातून मंदिरालगतच्या परिसराचा विकास करण्यात येत आहे. या शहराची कीर्ती त्यामुळे वाढणार आहे. या ऐतिहासिक ठेव्याचे जतन, संवर्धन व्हावे. पुढील पिढ्यांना मंदिराची यथायोग्य महती कळावी. जगभरातील पर्यटकांनी या स्थळाला भेट द्यावी म्हणून राज्य शासनाने शिवमंदिर परिसराचा विकास करण्याचा निर्णय घेऊन निधीही मंजूर केला आहे. सुशोभिकरण आराखडाही तयार आहे. १४० कोटी रूपये खर्चाचा हा प्रस्ताव पुरातत्व विभागाकडून अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई, ठाणे शहरांप्रमाणेच अंबरनाथचे महत्व वाढेल. जगभरातील पर्यटक शहरात येतील.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून अंबरनाथ शहराचा कायापालट होणाऱ्या योजना राबवल्या जात आहेत. त्यात आधुनिक शुटींग रेंज, सुसज्ज नाट्यगृह, क्रीडा संकुल हे प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत. गेली पाच वर्षे आयोजित केला जाणारा शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलने देशभरातील कलावंत आणि रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता शिवमंदिराच्या कलासंपन्न वास्तूकलेचा साजेसे शहरातील विविध चौक आणि रस्त्यांचे सुशोभिकरण केले जाणार आहे. त्यामुळे अंबरनाथ शहर टेंपल सिटी म्हणून ओळखली जाईल. त्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेने निविदा जाहीर केली आहे. प्राचीन शिवमंदिराच्या वास्तूशैलीला साजेसे चौक आणि रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन आणि सल्लागाराची नेमणूक तीन वर्षांसाठी केली जाणार आहे.
प्रतिक्रियाः अंबरनाथ शहर प्राचीन शिवमंदिरामुळे प्रसिद्ध आहे. या मंदिर परिसराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम सुरू आहे. शहरात इतर अनेक प्रकल्पही सुरू आहेत. मंदिराचे शहर या प्रकल्पामुळे अंबरनाथ शहराची जागतिक पातळीवर मंदिराचे शहर म्हणून ओळख स्थापीत होण्यास मदत होणार आहे. – डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार, कल्याण लोकसभा.
अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर हे शिलाहारकालीन स्थापत्यशैली आणि त्याकाळी प्रचलीत असलेल्या शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. अपरान्त म्हणजे आताच्या ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हा परिसरात इ.स. ८०० ते १२०० याकाळात शिलाहारांचे राज्य होते. शिवभक्त शिलाहारांनी त्यांच्या प्रदेशात अप्रतिम कलाकुसर असणारी अनेक मंदिरे बांधली. मात्र दुर्दैवाने काळाच्या ओघात त्यापैकी बहुतेक नष्ट झाली. परकियांची आक्रमणे अथवा नैसर्गिक आपत्तीने या प्राचीन वैभवाचा ऱ्हास झाला. काही ठिकाणी त्याचे भग्नावशेष आणि शिल्पशिळा उरल्या आहेत. फक्त अंबरनाथमधील शिवमंदिराची वास्तू अद्याप टिकून आहे. इसवीसन १०६० च्या श्रावण शुद्ध नवमीला शिलाहार राजा माम्वाणी यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. गेली ९६३ वर्षे हे मंदिर शिलाहारकालीन कलाश्रीमंत लोक जीवनाची साक्ष देत उभे आहे.