Wednesday, February 26 2020 9:38 am

अंबरनाथ प्राचीन शिवमंदिर, नेवाळीतील श्री मलंगगड, खिडकाळी येथील शिवमंदिर या तीर्थ क्षेत्राचा दर्जा वाढवून देण्याची खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची मागणी

 डोंबिवली:  ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे वसलेले पुरातन शिवमंदिर हे जिल्ह्याचे एक वैभव आहे. सुमारे एक हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन असे हे हेमाडपंती शैलीतले शिवमंदिर त्याकाळी ठाणे जिल्हा किती प्रगत होतायाची साक्ष देते. या शिवमंदिरात भाविकांची वर्षभर गर्दी असते. त्याचबरोबरशिवमंदिराला केंद्रस्थानी ठेवून पर्यटनाला गती देणे देखील शक्य आहे. त्याचदृष्टीने चार वर्षांपूर्वी सर्वांच्या सहकार्याने खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलची सुरुवात करण्यात आली. या फेस्टिव्हलमुळे कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात अंबरनाथची ओळख निर्माण होण्याबरोबरच या प्राचीन शिवमंदिराविषयही जागरुकता निर्माण होऊन अंबरनाथ आणि पर्यायाने ठाणे जिल्हा पर्यटनाच्या नकाशावर येईल अशी माहिती खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना दिली.

तरी शिवमंदिर परिसर सुशोभीकरणासाठी तातडीची बाब म्हणून सदर प्रस्तावास तातडीने मंजुरी मिळवून निधीची तरतूद करण्यात यावी. तसेच प्राचीन शिवमंदिरास सद्यस्थिती ‘क’ तीर्थ क्षेत्राचा दर्जा असून ‘अ’ तीर्थ क्षेत्राचा दर्जा देण्यात यावा जेणेकरून शासनाच्या पर्यटन व पर्यावरण संबंधी विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ प्राचीन शिवमंदिरास घेता येईल. तसेच येणाऱ्या भाविकांना उत्तम दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध होऊ शकतील. अशी मागणी खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रत्यक्ष भेटून आपल्या पत्राद्वारे केली.

तसेच नेवाळी येथील ऐतिहासिक श्री मलंगगड तीर्थक्षेत्र असून श्रीमलंगगडावर शिवकालीन गोपनीय अंतर्गत भुयारे, गडाच्या माथ्यावर पुरातन विहीर, पुरातन किल्याचे अवशेष, तसेच श्रीमलंगगड परिसरात पुरातन तोफ देखील आहेत. तसेच सदर श्री मलंगडावर लाखोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी दररोज येत असतात. श्री मलंगगड या तीर्थक्षेत्रास “ब” दर्जा असून “अ” दर्जा देण्यात यावा जेणेकरून शासनाचा लाभ घेता येईल, असा आग्रह ही डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केला.

शिळफाट्यालगतच देसाई गाव येथे खिडकाळी शीव मंदिर आहे. अंबरनाथ शहरातील शिवमंदिरापाठोपाठ खिडकाळी येथील प्राचीन शिवमंदिराचा उल्लेख केला जातो. खिडकाळी येथील शिवलिंग स्वयंभू आहे. या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक दरवर्षी येत असतात. तसेच महाशिवरात्री उत्सवाच्या दरम्यान काशी, अयोध्या, उत्तराखंड येथून साधू संत येते वास्तव्यास येतात. स्वामी शिवानंद महाराज यांनी १९३४ मध्ये येथे समाधी घेतली असून खिडकाळी मंदिर हे भाविकांसाठी तीर्थस्थान आहे. तसेच खिडकाळी मंदिरास तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी सदर ट्रस्टमार्फत मागणी देखील केली होती. पंरतु या तीर्थक्षेत्रास देखील दर्जा मिळावा यासाठी देखील खा.डॉ.श्रीकांत शिंदे प्रयत्नशील असून आग्रही मागणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली.