Tuesday, April 23 2019 10:11 pm

अंगणवाडी पर्यवेक्षिकांनी घेतले बाल आधार नोदणी व लाईन लिस्टिंग प्रशिक्षण

ठाणे : बाल आधार नोंदणी आणि लिस्टिंग नोंदणी प्रभावीपणे राबवल्यास अंगणवाडी सेविकांच्या कामाला गती  मिळेल. शिवाय याचा सकारात्मक परिमाण महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून राज्याच्या प्रगतीसाठी घेण्यात येणाऱ्या महत्वपूर्ण निर्णयावर होईल असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी व्यक्त केला. ठाण्यातील एन. के. टी. महाविद्यालय सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बाल आधार नोदणी व लाईन लिस्टिंग प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहसचिव ( महिला व बाल विकास ) एल. आर. गुजर उपस्थित होते.

अंगणवाड्यांच्या कामांमध्ये दिवसागणिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्याने अंगणवाड्यांचे कामकाज टेक्नोसेव्ही होत चालले आहे. मात्र अनेकदा कोणताही बदल घडत असताना तांत्रिक अडचणीना सामोरे जावे लागते. त्यावर मात करून अंगणवाडी सेविकांनी काम करण्याच्या पद्धतींमध्ये बदल केल्यास तंत्रज्ञानामुळे काम करण्याची  प्रक्रिया सुलभ होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी सहसचिव ( महिला व बाल विकास ) एल. आर. गुजर यांनी देखिल बाल आधार नोंदणी आणि लिस्टिंग नोंदणी केल्याने होणाऱ्या सकारात्मक बदलांची  चर्चा उपस्थितांशी  केली.

एकात्मिक बाल विकास सेवायोजनेतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची आधार नोंदणी करण्यासाठी मुख्य सेविका , पर्यवेक्षिका यांना मोबाईल टबलेटस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे मोबाईलद्वारे बाल आधाराची नोंदणीची कार्यवाही कशाप्रकारे करावी याचे प्रशिक्षण माहिती तंत्रज्ञान विभागाकडून मुख्य सेविका , पर्यवेक्षिका यांना देण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले यांनी दिली.

यावेळी ठाणे , रायगड , मुंबई शहर आणि उपनगर मधील साधारण पाचशेहून अधिक अंगणवाडी  मुख्य सेविका , पर्यवेक्षिकानी   या प्रशिक्षण शिबाराचा एकत्रितपणे लाभ घेतला. प्रशिक्षणासाठी विभागीय आयुक्त (महिला व बाल विकास) राहुल मोरे , कक्ष अधिकारी रमेश सरफरे , ठाणे परिषद जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले तसेच जिल्हा परिषद महिला व विकास विभागाचे अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.